एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगात लक्षणीय घट

महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सव्‍‌र्हायकल कॅन्सर) प्रमाण एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या प्रतिबंधात्मक लशीमुळे लक्षणीयरीत्या घटले आहे.

भारतात लसीकरण व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचा तज्ज्ञाचा सल्ला

पुणे : महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सव्‍‌र्हायकल कॅन्सर) प्रमाण एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या प्रतिबंधात्मक लशीमुळे लक्षणीयरीत्या घटले आहे. त्यामुळे भारतातही या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे. २००८ मध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये एचपीव्ही लस देण्यास सुरुवात झाली. या लशीची परिणामकारकता अभ्यासणाऱ्या पहिल्या जागतिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.  लसीकरणानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सुमारे ९० टक्के घट झाली आहे.

१४ ते १६ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगामध्ये ६२ टक्के, तर १६-१८ वर्ष वयोगटामध्ये सुमारे ३४ टक्के एवढी घट झाली आहे. त्यामुळे या लशीची परिणामकारकता स्पष्ट झाली आहे. जगातील सुमारे तीन लाख महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आकडेवारीतून समोर येते. गर्भाशय मुखाचा म्हणजेच सव्‍‌र्हायकल कॅन्सर हा ९९ टक्के वेळा ह्युमन पॅपिलोमा या विषाणुमुळे होतो.

एचपीव्ही लशीमुळे विषाणूचा संपूर्ण नाश होत नाही, मात्र त्यामार्फत होणारा संसर्ग जवळजवळ नष्ट होतो, असे निरिक्षण या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत शंभरपेक्षा अधिक देशांनी एचपीव्ही लशीचा वापर सुरू केला आहे. एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेल्या महिलांमध्ये संसर्गानंतर दीर्घकाळानंतरही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे दिसण्याची शक्यता असते.

भारतातील चित्र गंभीरच

भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. गर्भाशय मुखाच्या सर्व प्रकारच्या कर्करोगांसाठी एचपीव्ही विषाणू कारणीभूत आहे. एचपीव्ही संसर्ग हा लैंगिक संबंधामधून स्त्री-पुरुषांमध्ये पसरण्याची शक्यता असते. कमी रोगप्रतिकार शक्ती, तंबाखूचे अतिसेवन किंवा धूम्रपान, असंतुलित आहार, मांसाचे सेवन, मद्यपान, लैंगिक संबंधांतून होणारे संसर्ग, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा असे जीवनशैलीशी निगडित बदलही या कर्करोगाच्या तीव्रतेला कारणीभूत ठरतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

एचपीव्ही लस कोणासाठी?

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी म्हणाल्या, की एचपीव्ही लसीकरणामुळे जागतिक स्तरावरील गर्भाशय मुखाच्या कर्करोगात घट झाली आहे, हे वास्तव आहे. भारतात या कर्करोगाचे प्रमाण हे अल्प उत्पन्न गटांतील महिलांमध्ये अधिक आहे. विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये अशा रुग्ण महिला मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतात. लशीची किंमत हा भारतातील चित्र बदलण्यामागील मुख्य अडथळा आहे. त्यामुळे एचपीव्ही लसीकरणाबाबत देशाचे धोरण तयार होणे आणि त्याची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cervical cancer hpv vaccination ysh

ताज्या बातम्या