पुणे: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्याला कारणीभूत ठरणारा ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही ) या संदर्भात ‘ग्रीनॲरे लॅब्स’ने गेल्या पाच वर्षांत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातील इटानगर या भागांतून गोळा करण्यात आलेल्या १२,३७३ नमुन्यांच्या विश्लेषणातून ३१ ते ५० वयोगटातील महिलांना गर्भाशय मुखाचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संसर्ग आढळलेल्या महिलांपैकी ३४.५ टक्के महिलांमध्ये एकाच वेळी दोन किंवा अधिक धोकादायक एचपीव्ही प्रकारांचा संसर्ग आढळला आहे. ‘एचपीव्ही- १६’ हा प्रकार सर्वाधिक महिलांमध्ये आढळला असून, त्यापाठोपाठ एचपीव्ही- ३१, ३३ आणि १८ हे धोकादायक प्रकारही आढळून आले आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील नमुन्यांच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रात ‘एचपीव्ही’ आढळण्याचे प्रमाण २.४ टक्के, कर्नाटकात ३.६ टक्के, ओडिशात ३.१ टक्के, तर इटानगरमध्ये ६.५ टक्के असल्याचे निदर्शनास आले.

‘जागतिक आरोग्य संघटनेने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग संपविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात दर दोन मिनिटांनी एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू होतो. भारतात २०२४ मध्ये या आजारामुळे सुमारे ३६ हजार महिलांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे,’ असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

वेळेत ‘एचपीव्ही’ तपासणी आणि आवश्यक उपचार केल्यास हा कर्करोग टाळता येऊ शकतो. त्यामुळे महिलांनी तपासणीबाबत जागरूक राहणे आणि ‘एचपीव्ही’ आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील तपासणी करणे आवश्यक असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

महिलांना ‘एचपीव्ही’ संसर्ग तपासणी सहज करता यावी, यासाठी शास्त्रज्ञ डॉ. प्रीती हेलकर यांनी सर्व्हिसेन्स हे नमुना तपासणी किट विकसित केले आहे. त्यासाठी महिलांना आता तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागणार नाही. महिला स्वत:च नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत देऊ शकतात. त्यामुळे आता भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान ताबडतोब होऊ शकणार आहे. – डॉ. संजय गुप्ते, स्त्री-रोग तज्ज्ञ