पुणे: गर्भाशय मुख कर्करोगापासून (सर्व्हाइकल कॅन्सर) किशोरींचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला पाच महिने उलटूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. राज्यात १४ वर्षे वयोगटातील ९.८४ लाख पात्र मुलींपैकी केवळ आठ ते नऊ टक्के मुलींचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात ही मोहीम चाचपडत असताना, दुसरीकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे.
राज्य कुटुंब कल्याण व आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी नुकतीच पाच महिन्यांची आकडेवारी जारी केली. त्यानुसार, मार्च ते १० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ९ लाख ८४ हजार ४१४ पात्र मुलींपैकी केवळ ७९ हजार २१४ मुलींचेच लसीकरण शक्य झाले आहे. हे प्रमाण अवघे ८.४३ टक्के इतकेच आहे. या मोहिमेसाठी आरोग्य प्रशासनाने राज्यभरात १ लाख ७७ हजार ८४७ विशेष शिबिरांचे नियोजन केले होते. मात्र, पालकांमधील भ्रम, भीती आणि प्रशासकीय पातळीवरील प्रबोधनाचा अभाव यांमुळे लसीकरणाचा आलेख घसरल्याचे डॉ. सांगळे यांनी नमूद केले.
या समस्येवर मात करण्यासाठी आता शिक्षण विभाग आणि ‘आयएमए’च्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) डॉक्टरांची मदत घेऊन व्यापक प्रबोधन मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण आणि आरोग्य विभागाच्या ‘यू विन पोर्टल’वर गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि मिझोराम यांनी लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले असल्याची नोंद आहे. गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस जिल्ह्यातील सर्व रुग्णालय तसेच, तालुकास्तरावरील उपकेंद्रे याबरोबरच महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध याविषयी जनजागृती करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
