पुणे : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. सिंहगड रस्ता, सारसबाग, मित्रमंडळ चौक, हडपसर परिसरात चोरट्यांनी दागिने हिसकावून नेले.
सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलशुद्धीकऱ्ण केंद्र परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ५० वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. रविवारी (३१ मे) सकाळी आठच्या सुमारास त्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत. या घटनेनंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी सारसबाग परिसरातील दादावाडी जैन मंदिरासमोर एका पादचाऱ्याच्या गळ्यातील एक लाख ८० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत एका ५७ वर्षीय तक्रारदाराने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सारसबाग परिसरातील मित्रमंडळ चौकात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख ५६ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव तपास करत आहेत.
हडपसरमधील रामटेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास फिरायला निघालेल्या एकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वानवडी परिसरात रविवारी सकाळी देवदर्शनासाठी निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तीन लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.
सोन्याचे भाव वाढल्यानंतर गुन्हे वाढले
गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात टप्याटप्याने वाढ झाली. सोन्याचे भाव वाढल्यानंतर शहरात पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली अहे. रविवारी दिवसभरात दुचाकीस्वार चोरट्यांनी नागरिकांकडील साडेआठ लाख रुपयांचे दागिने हिसकावले. दागिने हिसकावण्याच्या घटना कमी झाल्या होत्या. सोन्याचे भाव वाढल्यानंतर शहरात पुन्हा दागिने हिसकावण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. दागिने हिसकावणारे चोरटे परराज्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
