शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून त्याच्या बंदोबस्तात पोलीस गुंतलेले पाहून सोनसाखळी चोरटय़ांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी शहरात सहा ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये सव्वातीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.
प्रभात रस्त्यावरील राहणाऱ्या निर्मला शिंदे (वय ५८) या सकाळी सव्वासातच्या सुमारास कलमाडी हाउसकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरांनी २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून नेले. कर्वेनगर विकास चौकाजवळ शनिवारी सकाळी जनाबाई बराटे (वय ६५, रा. वारजे) या पायी घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. तिसरी घटना ही सकाळी सव्वासातच्या सुमारास शुक्रवार पेठेतील किरण हेअर ड्रेसेस समोर घडली. ज्योत्स्ना मेहता (वय ६२, रा. शुक्रवार पेठ) या दुकानातून दूध घेऊन घरी जात असताना स्कूटरवर येऊन दोघांनी साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. अशाच प्रकारच्या घटना भोसरी, येरवडा, या ठिकाणी घडल्या. गेल्या काही दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होता. आता गणेशोत्सवात सोनसाखळी चोरटय़ांनी पुन्हा डोके वर काढले आहे.