सहकार खात्याच्या समिती अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती

विद्या सहकारी बँकेच्या ‘बँकिंग दिनदर्शिके’चे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्याशी संबंधित प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार खात्याने तीन सदस्यांचा समावेश असलेली समिती नियुक्त केली आहे. विद्या सहकारी बँकेचे कार्यवाहक संचालक विद्याधर ऊर्फ बाळासाहेब अनास्कर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.
विद्या सहकारी बँकेच्या ‘बँकिंग दिनदर्शिके’चे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पाटील म्हणाले, सहकार खात्याचे काही प्रश्न हे केंद्र सरकारशी तर काही प्रश्न रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत. तांत्रिक बाबींच्या पूर्ततेअभावी अनेकदा हे प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे सहकाराच्या निकोप वाढीसाठी ते मारक ठरते. या पाश्र्वभूमीवर अशा प्रश्नांची नेमकेपणाने जाण असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. हे प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी काम करणार आहे. बाळासाहेब अनास्कर हे या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारला अद्ययावत ठेवण्यासाठी ही समिती काम करणार आहे. राज्याच्या नव्या सहकार कायद्यातील त्रुटी दूर करून हा कायदा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी ही समिती सरकारला मार्गदर्शन करेल.
‘दादा, तुम्ही आक्रमक व्हा!’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या गिरीश बापट यांनी ‘दादा, तुम्ही आक्रमक व्हा’, असा सल्ला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला. मात्र, तुमच्या स्वभावातील शांतपणा माझ्याकडे येऊ द्या, असे सांगण्यासही बापट विसरले नाहीत. काही प्रश्न असे असतात की तेथे मवाळ भूमिका घेऊन चालत नाही. बाळासाहेब अनास्कर त्यांचे काम चोखपणे करतील. पण, सहकारमंत्री म्हणून काही प्रश्नांसंदर्भात तुमचाही आवाज केंद्रापर्यंत आणि रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचलाच पाहिजे, अशी अपेक्षा गिरीश बापट यांनी बोलून दाखविली. माझ्याबाबत बोलायचे झाले, तर मी नको तेवढे आक्रमक आहे. त्यामुळे तुमच्या स्वभावातील शांतपणा माझ्याकडे येऊ देत, अशी इच्छाही बापट यांनी प्रदर्शित केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chairman appointed balasaheb anaskar follow up center reserve bank