पुणे : चाकण परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात अतिक्रमणांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे काढताना अनेक वेळा विरोध केला जातो अथवा दबाव आणला जातो. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिक्रमण काढताना कोणाचीही गय करू नये आणि शासकीय यंत्रणांनी अतिक्रमणांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकणसाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला असून, त्याचे सादरीकरणही उपमुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील विविध प्रश्न, तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की चाकण परिसरात अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिक्रमणांना पाठबळ न देता त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अतिक्रमण निर्मूलनावेळी स्थानिक पातळीवरून विरोध किंवा अडथळे निर्माण झाल्यास कामाला विलंब होतो. त्यामुळे नागरिक, उद्योजक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे.

चाकणच्या प्रश्नांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि इतर यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगाने काम सुरू केले आहे. विविध बैठकांमध्ये समोर आलेल्या प्रश्नांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, सुरक्षाव्यवस्था, अतिक्रमण, गृहनिर्माण संस्था, तसेच शाळांशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल. राज्य शासनाच्या अखत्यारितील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. चाकण, तसेच संपूर्ण औद्योगिक परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी उद्योजक, तसेच वाहतूक, उद्योग आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी व समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली, तसेच त्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी सबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी, तसेच उद्योजक उपस्थित होते.

‘ॲक्शन प्लॅन’ सादर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकणच्या विकासासाठी नेमलेल्या समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित केल्याचे सांगितले. रस्त्यांवरील खड्डे व सेवा रस्त्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.