पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिसरातील सर्व रस्ते येत्या २५ ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या अंतर्गत येणारे सर्व रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुदतीनंतर रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटविण्यात येणार असून संबंधितांनी स्वखर्चाने अतिक्रमणे हटवावीत अन्यथा त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, एमआयडीसीचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुलाब इनामदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चाकण परिसरातील नदी, नाले तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे संबंधितांनी एका महिन्याच्या आत स्वखर्चाने काढावीत. मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनामार्फत ती हटविण्याची कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे आणि नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले. या बैठकीत चाकण परिसरातील धोकादायक ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक गतिरोधक काढून राष्ट्रीय रस्ते काँगेसच्या मानांकानुसार गतिरोधक उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
तसेच आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता चिन्हे, परावर्तक पट्ट्या आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यावर नियमानुसार दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. रस्त्यावर कोणीही पार्किंग करू नये, अशी सूचनाही संबंधित यंत्रणांकडून दिली जाणार आहे. रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने ती निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही डुडी यांनी सांगितले. तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली.
सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेश
तळेगाव चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, वाघजाई नगर-खराबवाडी रोड, म्हाळुंगे इंगळे येथील चौक, खालुंब्रे येथील चौक, शिंदे वासुली येथील चौक, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा तसेच बिरदवडी फाटा, दवने मळा ते द्वारका सिटी रोड, कॉर्निंग कंपनी ते राष्ट्रीय महामार्ग पुणे-नाशिक या ठिकाणी दुरवस्था झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला असल्याची नोंद घेण्यात आली. या सर्व ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
