पुणे : चाकण परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची चक्रे अखेर फिरू लागली आहेत. चाकण औद्योगिक नगरी स्थापन करण्याचा प्रस्ताव ११ वर्षे राज्य सरकारकडे प्रलंबित होता. त्याला आता गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तातडीने या संदर्भात पावले उचलली आहेत. या बाबत ‘एमआयडीसी’ने विविध शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. त्यात चाकण औद्योगिक नगरी विकसित करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.
चाकणमधील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था उद्योजकांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर समोर आली. याची गंभीर दखल घेऊन सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांचे रूपांतर औद्योगिक नगरीत करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक झाली. बैठकीला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत चाकण औद्योगिक नगरी विकसित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर चाकण आणि तळेगाव परिसरात सध्या सुरू असलेले आणि भविष्यात होणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांसाठी सविस्तर नियोजनासह चाकण आणि तळेगावमधील नागरी विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी शाश्वत औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
चाकण, तळेगावसाठी प्राधान्यक्रमाची कामे
- खड्डे बुजविण्यासह रस्त्यांची दुरुस्ती
- रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे
- रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई
- वाहनतळ विकसित करणे
- पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांना गती
चाकणचा एकात्मिक सर्वंकष आराखडा
चाकण परिसराचा एकात्मिक सर्वंकष आराखडा तयार केला जाणार आहे. या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासोबत चाकण औद्योगिक परिसराचा भविष्यातील विस्तार डोळ्यासमोर ठेवून नगर नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चाकण औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर या आराखड्यात भर देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.
चाकण, तळेगावमधील रस्त्यांचे जाळे
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ – ५३.२० किलोमीटर
सार्वजनिक बांधकाम विभाग – ६३.२० किलोमीटर
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण – २९.९२ किलोमीटर
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ – ४१ किलोमीटर
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – ४०.७४ किलोमीटर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – ११४.०६ किलोमीटर
अन्यथा उद्योग स्थलांतरित होतील
चाकण औद्योगिक परिसराच्या कोंडीमागे प्रामुख्याने शासकीय यंत्रणांतील समन्वयाचा अभाव कारणीभूत आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे औद्योगिक नगरीत रूपांतर करण्याचे पाऊल स्वागतार्ह आहे. मात्र, हे दीर्घकालीन नियोजन करताना उद्योगांना सध्या भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. अन्यथा उद्योग येथून स्थलांतरित होतील. या परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी भूमिका फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी मांडली.
