पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्र सुमारे सात हजार एकरांवर विस्तारले असून, या क्षेत्राबाहेर तेवढ्याच जागेवर औद्योगिक विस्तार झाला आहे. गेल्या तीन वर्षांत चाकणमधून किती उद्योग स्थलांतरित झाले अथवा नवीन उद्योग आले याची माहिती उद्योग विभागाच्या आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, चाकणमध्ये उद्योगांना जागेची टंचाई भासू  लागल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा सहावा टप्पा विकसित करण्याचे मोठे पाऊल उद्योग विभाग आता उचलणार आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातून कंपन्या स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे चाकणमधील जागेच्या टंचाईची समस्या समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी म्हणाले, की चाकण औद्योगिक क्षेत्र एकूण ७ हजार २५० एकरांवर विस्तारलेले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर यापेक्षा जास्त जागेवर उद्योग विस्तारलेले आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्राचे एकूण पाच टप्पे आहेत. आगामी काळात विस्ताराचा सहावा टप्पा हाती घेतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे उद्योगांना आणखी जागा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर खेडमध्येही सध्या उद्योगांना विस्तारासाठी जागा उपलब्ध आहे.

दरवर्षी १०० कोटींचा निधी

चाकणमधील उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी एमआयडीसीला दर वर्षी ७५ ते १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे सहापदरीकरण आणि उन्नत महामार्गाच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. चाकणमधून अद्यापपर्यंत एकही कंपनी बाहेर निघून गेलेली नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पुरेशी जागा उपलब्ध नाही

चाकणमध्ये गेल्या वर्षभरात एक हजार जागांवर नवीन उद्योग आले आहेत. या कालावधीत ५०० कंपन्यांनी चाकणमध्ये गुंतवणूक केलेली आहे. चाकणमधून गेल्या तीन वर्षांत एकही कंपनी स्थलांतरित झालेली नाही. उद्योगांना चाकणमध्ये सध्या पुरेशी जागा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा सहावा टप्पा विकसित केला जाणार आहे, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

रस्ते प्रकल्पांना गती

चाकण टप्पा १ व २ – १४.६५ किलोमीटर चाैपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू.

आळंदी फाटा ते फोक्सवॅगन ते स्कोडा कंपनी – ५.७ किलोमीटर चाैपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू.

चाकण टप्पा ४ – ४.४ किलोमीटर चाैपदरी मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू.

चाकण टप्पा ५ – ३.५ किलोमीटर सहापदरी काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण.

चाकण टप्पा २ – ५.५ किलोमीटर चाैपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण.