पुणे : चाकण परिसरातील २० लघुउद्योगांनी पुण्याबाहेर स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यावरून गदारोळ उडाला असून, या निमित्ताने चाकणमधील जागेची टंचाई, पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था आणि वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने चर्चेत आली आहे. या लघुउद्योगांच्या गटाने सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक क्षेत्रात विस्तार करण्यासाठी मार्च महिन्यात जागेची मागणी केली होती. त्यामुळे या उद्योगांचा विस्तार, की स्थलांतर असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी उद्योगमंत्र्यांसह राज्य सरकार ‘ॲक्शन मोड’वर आले आहे.
चाकण हे वाहननिर्मितीसह उत्पादन क्षेत्राचे देशातील आघाडीचे केंद्र आहे. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्या चाकणमध्ये कार्यरत आहेत. या परिसरातील २० लघुउद्योगांनी जागेच्या टंचाईमुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित होण्याचा इशारा दिला. या लघुउद्योगांनी विस्तारासाठी जागा उपलब्ध नसण्यासह पायाभूत सुविधांची खराब अवस्था आणि वाहतूककोंडी हे प्रश्न उपस्थित केले. चाकण परिसरातून हे लघुउद्योग अद्याप स्थलांतरित झालेले नसून, जागा आणि इतर सुविधा न मिळाल्यास स्थलांतर करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) चाकण आणि तळेगावमधील उद्योग संघटनांची आज बैठक घेतली. त्यात उद्योगांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यांचे प्रश्न केवळ एमआयडीसी क्षेत्रापुरते मर्यादित नसून, त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. ‘एमआयडीसी’कडून हद्दीतील कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात असून, त्या बाहेरील क्षेत्रात हे शक्य नाही. ‘एमआयडीसी’कडून चाकणमध्ये अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील काही पूर्ण झाली असून, काही प्रगतिपथावर आहेत. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे ‘एमआयडीसी’चे अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे यांनी सांगितले.
एमएसएमईचे सर्वेक्षण करणार
राज्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ( एमएसएमई) सुरू करताना त्यांची नोंद केली जाते. मात्र, तो उद्योग स्थलांतरित अथवा बंद झाल्यानंतर त्याची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातून किती उद्योग बंद झाले वा स्थलांतरित झाले याबाबतची वस्तुस्थिती समजेल. चाकणला पुढील आठवड्यात भेट देऊन उद्योगांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बाहेर जाण्याची इच्छा नाही
चाकण परिसरात उद्योगांच्या विस्तारासाठी जागेची टंचाई आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे आम्ही सातारा जिल्ह्यात जागेसाठी अर्ज केला होता. चाकण सोडून जाण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला इथे जागा आणि पुरेशा पायाभूत सुविधा मिळाल्यास आम्ही चाकण सोडून जाणार नाही, अशी भूमिका लघुउद्योजक गटाचे अध्यक्ष शंतनू कुलकर्णी यांनी मांडली.
केवळ ४ कंपन्या एमआयडीसीतील
लघुउद्योगांच्या या गटातील २० पैकी केवळ ४ कंपन्या चाकण एमआयडीसी हद्दीतील आहेत. या कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक क्षेत्रात विस्तारासाठी मार्चमध्ये म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधी जागेची मागणी केली होती. चाकणमधून व्यवसाय बंद करून हे उद्योग स्थलांतरित होणार नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.
