पिंपरी : चाकण एमआयडीसीची परिस्थिती अतिशय खराब आहे. रस्त्यांची चाळण झाली असू खड्डे पडले आहेत. येथील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने १४ जणांची समिती स्थापन केली आहे. त्याऐवजी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी केली. उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. त्यात महाराष्ट्रातून गेल्या पाच वर्षात ३५,३०० उद्योग बंद किंवा इतर राज्यात गेले असल्याचे सांगितले आहे. याचा रोजगारावर वाईट परिणाम झाला आहे. चाकण एमआयडीसीतील उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
त्यामुळे २० उद्योजकांनी स्थलांतरित होण्याची भूमिका घेतली आहे. एमआयडीसीतील उद्योजकांना पुरेशी वीज, पाणी, चांगले रस्ते देणे आवश्यक आहे. एमआयडीसीमध्ये उद्योगाचा वास आला पाहिजे, मात्र येथे कचऱ्याचा वास येत आहे. कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चाकणचा प्रश्न सोडवायला अजून काय करायचंय? प्लॉटिंग झालंय, इंडस्ट्री आलीय. ती इंडस्ट्री स्वतःच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार की प्रायव्हेट रस्त्यांमध्ये करणार? एक कोणीतरी व्यक्ती द्या, जी हे सगळे रस्ते सुधारू शकेल. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या सरकारचा प्राधान्यक्रम चुकीचा आहे. एखादे कोणतरी क्रिकेट मॅच वगैरे जिंकून आले, तर त्यांना एक कोटी दिले जातात.
त्याला विरोध नाही. पण, दुसरी बाजू पाहिली तर कुठे अपघाती मृत्यू झाला, कुठे मेट्रोची स्लॅब कोसळली किंवा कुठे काही अजून काही झाले, तर काय ४ लाख, ५ लाख दिले जातात. शेतकऱ्यांना तर गृहीतच धरले जात नाही, असे ठाकरे म्हणाले. एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, स्टेट हायवे आणि एनएचएआय यांच्यात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवली आहे. उद्योगधंद्यांना इथे राहणे हे कठीण करून ठेवले आहे. उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित रविवारी उद्योगमंत्री येतात असं मला कळलं.
त्यांनी रविवारी येऊ नये, एखाद्या वर्किंग डेला यावे, प्रोटोकॉल, सिक्युरिटी बाजूला ठेवावा. सायरन न वाजवता फिरावे. जेणेकरून कुठे आणि किती वेळ लोक वाहतूक कोंडीत अडकतील हे लक्षात येईल. त्यामुळे त्यांचे तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरूवात होईल. पीएमआरडीएमध्ये फाईल पास करायला ‘अंडर द टेबल’ खूप काही गोष्टी द्यायला लागतात. एमआयडीसीमध्ये प्लॉट घेण्यासाठी १५०० रुपये पर स्क्वेअर मीटर प्रमाणे पैसे द्यावे लागतात, असा आरोपही आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
