पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि त्यामुळे होणारी उद्योगांची कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चाकणमधील उद्योगांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर आता त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर तिथेच सुटाव्यात यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे चाकणमधील उद्योजकांना पुण्यात येण्याची आवश्यकता न राहता त्यांच्या समस्या तिथेच सुटण्यास मदत होणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते याच महिन्यात होणार आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार सुमारे ७ हजार २५० एकरांवर विस्तारलेला आहे. हे औद्योगिक क्षेत्र पाच टप्प्यांत विस्तारलेले आहे. या क्षेत्राची जबाबदारी ‘एमआयडीसी’च्या विभागीय कार्यालयाकडे आहे. हे कार्यालय सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. चाकणमधील उद्योजकांना प्रशासकीय कामांसह इतर समस्यांसाठी पिंपरी-चिंचवडमधील ‘एमआयडीसी’च्या कार्यालयात यावे लागते. हे अंतर सुमारे २० किलोमीटर आहे. मात्र, सध्याची वाहतूक कोंडीची समस्या पाहता उद्योजकांचा पिंपरी-चिंचवडमधील कार्यालयात जाण्या-येण्यात एक दिवस वाया जातो. या पार्श्वभूमीवर ‘एमआयडीसी’ने चाकणमध्ये टप्पा क्रमांक दोनमध्ये भांबोली येथे उपअभियंता कार्यालय सुरू करण्याचे नियोजन केले होते. ही इमारतही बांधून तयार असून, आता ‘एमआयडीसी’ने तिथे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी या कारणांमुळे चाकणमधील २० लघुउद्योजकांनी तेथून स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. यानंतर ‘एमआयडीसी’ने उद्योजकांच्या सोयीसाठी चाकणमध्ये विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योजकांना पिंपरी-चिंचवडमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसह उद्योजकांच्या समस्या यामुळे तातडीने सुटण्यास मदत होणार आहे. याचबरोबर ‘एमआयडीसी’कडून चाकणमध्ये हाती घेण्यात आलेली पायाभूत सुविधांची नवीन कामेही लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्योजकांचा वेळ वाचेल

चाकणमधील उद्योजकांना त्यांच्या कामांसाठी सध्या पिंपरी-चिंचवडमधील ‘एमआयडीसी’च्या विभागीय कार्यालयात यावे लागते. यात त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे चाकणमध्येच ‘एमआयडीसी’चे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या कार्यालयात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंत्यांसह सुमारे ३० कर्मचारी असतील. या कार्यालयाचे उद्घाटन लवकरच होणार आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे यांनी सांगितले.

विभागीय कार्यालयाची कामे

  • कारखाना उभारण्यास मंजुरी
  • कारखान्याच्या बांधकाम आराखड्यास मंजुरी
  • नवीन रस्ते तयार करणे
  • रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती
  • सांडपाणी वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती
  • नवीन पाणीपुरवठा जोडणी
  • पाणीपुरवठा वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती
  • पाणीपुरवठा देयक आकारणी
  • अतिक्रमणे हटविणे
  • उद्योगांच्या तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई

प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही कार्यालय

जिल्ह्यातील उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामासाठी पुण्यात यावे लागते. त्यांचा खूप वेळ वाया जातो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांच्या परिसरात मंडळाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. पुण्यात आधी बारामतीमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयांच्या माध्यमातून उद्योगांना स्थानिक पातळीवर चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा हेतू आहे.