पिंपरी : म्हाळुंगे, चाकण एमआडीसी, पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव व चाकण-शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत मोठी भर पडत आहे. त्याचा उद्योगांना मोठा फटका बसत असून, येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष नियोजन करण्याची मागणी उद्योजकांनी पोलिसांकडे केली.

उद्योजकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उद्योजकांबरोबर बैठक घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता नीलेश मोडवे, सहायक कामगार आयुक्त मुकुंद होने, महावितरणचे केशव कालुमाळी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, मारुती जगताप, विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त प्रिया डमाळे, सुदर्शन राठोड, गुलाब इमानदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, दिगंबर सूर्यवंशी, संजय सोळंके, जितेंद्र कदम यांच्यासह ६० उद्योजक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

म्हाळुंगे, चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक समस्या बिकट झाली आहे. पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव व चाकण-शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ झाली आहे. अवजड वाहनेही रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. ती सोडविण्यासाठी वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याची मागणी उद्योजकांनी बैठकीत केली. कंपन्यातील कामगारांची सुरक्षा, उद्योजक, कामगारांमध्ये सुरक्षिततेचे वातावारण निर्माण करणे, कायदा व सुव्यस्थेबाबत चर्चा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्त्यावर वाहने उभी केल्याने कोंडीत भर

एमआयडीसीने वाहनतळाची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जागा उपलब्ध झाल्यास अवजड वाहनांचा पार्किंगचा प्रश्न सुटेल. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होणार नाही. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत असून, कोंडीत भर पडत आहे. खड्डे बुजविल्यानंतर कोंडी कमी होईल. रस्त्यावर अवजड वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले.

औद्योगिक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रारीचे आवाहन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाअंतर्गत सुमारे ४० ते ४५ लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, भोसरी, म्हाळुंगे, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी सुमारे दोन हजार लहान आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत. उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे, गुन्ह्यांच्या निराकरणासाठी औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. कोणीही त्रास देत असेल, तर उद्योजकांनी या कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

उद्योजकांना कोणताही त्रास होणार याची दक्षता घेतली जात आहे. पोलीस उद्योजक, कामगारांच्या पाठीशी आहेत. औद्योगिक कक्षाकडे तक्रार येताच तत्काळ कारवाई केली जाते. उद्योजकांनी पुढे येऊन तक्रार करावी. ७५१७७५१७९३, ९०२९६३३४५२ किंवा indgrevcell-pcpc@mah.govi.in या इ-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त
विनयकुमार चौबे यांनी केले आहे.