पुणे : चाकणमधील प्रश्न गंभीर असून, सरकारने त्याची दखल घेतली आहे. या संदर्भात एक बैठकही झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर चाकणमधील सगळ्या पायाभूत सुविधांत सुधारणा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याचबरोबर पुण्यातील चाकणसह सर्वच एमआयडीसी क्षेत्रांचे इंडस्ट्रियल टाऊनशिप म्हणजेच औद्योगिक नागरी वसाहतीत रूपांतरित करण्याचे पाऊल उचलण्याचे निर्देश नगर विकास विभाग आणि उद्योग विभागाला त्यांनी दिले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातून कंपन्या स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे चाकणमधील जागेच्या टंचाईची समस्या समोर आली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. चाकण औद्योगिक क्षेत्र सुमारे सात हजार एकरांवर विस्तारले असून, या क्षेत्राबाहेर तेवढ्याच जागेवर औद्योगिक विस्तार झाला आहे. मात्र, उद्योगांना पायाभूत सुविधांचा अभाव त्रासदायक ठरत आहे.

‘चाकणमध्ये तीन वर्षांत पाचशे नव्या कंपन्यांची गुंतवणूक आली आहे. जागेच्या वाढत्या मागणीमुळे आगामी काळात चाकण औद्योगिक क्षेत्राचा सहावा टप्पा विकसित केला जाणार आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिली.

दरम्यान, राज्य सरकारच्या औद्योगिक नगरी कायद्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘या कायद्यानुसार औद्योगिक क्षेत्रांना नागरी वसाहतीत परावर्तित करावे लागेल. त्यामुळे तेथील पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास शक्य होईल. याची सुरुवात पुण्याच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्रामधून केली जाईल. याबाबत नगरविकास विभाग आणि उद्योग विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.’

नेमके प्रकरण काय?

चाकण हे वाहननिर्मितीसह उत्पादन क्षेत्राचे देशातील आघाडीचे केंद्र आहे. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्या चाकणमध्ये कार्यरत आहेत. या परिसरातील २० लघुउद्योगांनी जागेच्या टंचाईमुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित होण्याचा इशारा दिला. या लघुउद्योगांनी विस्तारासाठी जागा उपलब्ध नसण्यासह पायाभूत सुविधांची खराब अवस्था आणि वाहतूककोंडी हे प्रश्न उपस्थित केले. चाकण परिसरातून हे लघुउद्योग अद्याप स्थलांतरित झालेले नसून, जागा आणि इतर सुविधा न मिळाल्यास स्थलांतर करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

उद्योगांची भूमिका काय?

चाकण परिसरात उद्योगांच्या विस्तारासाठी जागेची टंचाई आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे आम्ही सातारा जिल्ह्यात जागेसाठी अर्ज केला होता. चाकण सोडून जाण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला इथे जागा आणि पुरेशा पायाभूत सुविधा मिळाल्यास आम्ही चाकण सोडून जाणार नाही, अशी भूमिका लघुउद्योजक गटाचे शंतनू कुलकर्णी यांनी मांडली.