पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेवर भटक्या श्वानांच्या टोळक्याने हल्ला केला. यात महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी (१६ मार्च) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली.

शोभा विजय वाघमारे (वय ३३, सध्या रा. चाकण, मूळ रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या चाकण येथील एका खासगी कंपनीत काम करत होत्या. रात्री काम आटोपून त्या पायी घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पाच ते सहा भटक्या श्वानांच्या टोळक्याने पायी जाणाऱ्या महिलेवर अचानक हल्ला केला. श्वानांच्या हल्ल्यात त्या खाली पडल्या. त्या गंभीर जखमी झाल्या.

या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना घातपाताची असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण ताब्यात घेतले.

तपासादरम्यान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात श्वानांचे टोळके महिलेवर हल्ला करत असल्याचे दृश्य स्पष्टपणे कैद झाल्याचे दिसून आले. या चित्रीकरणामध्ये श्वान महिलेवर झडप घालत असल्याचे आणि तिच्यावर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.