पुणे : चाकण परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे, त्यानंतर त्याच जागी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी तातडीने रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.

चाकण परिसरातील रस्तेदुरुस्ती, वाहतूककोंडी निवारण व वाहतूक व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय समितीत जिल्हाधिकारी बोलत होते. आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख या वेळी उपस्थित होते. बैठकीत चाकण परिसरातील नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या. या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित विभागांना विविध सूचना दिल्या. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविणे व तातडीची रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. त्यानंतर १ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील कामे सुरू करता यावीत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतच्या कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमणे, पार्किंग, सांडपाण्याबाबतची कामे समन्वयाने वेगाने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास चोवीस तास वाहतूक वळवून काम पूर्ण करून रस्ता तातडीने वाहतुकीस खुला करावा. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे, साइडपट्ट्या, गाळ, कचरा हटविण्याची तातडीची कामे पूर्ण करावीत, असा आदेश त्यांनी दिला.

रस्त्याचे काम सुरू असताना त्याच मार्गावरून सातत्याने वाहतूक सुरू ठेवल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता या दोन्हींवर परिणाम होतो. त्यामुळे कामाचे स्वरूप व कालावधी लक्षात घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे पूर्वनियोजन करावे. आवश्यकतेनुसार काही दिवस २४ तास काम करून रस्ता पूर्ण करावा. संबंधित विभागांनी कामाचे टप्पे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन करावे. पीएमआरडीए, इतर विभागांची सुरू असलेली कामे परस्पर समन्वयाने पूर्ण करून वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, याची दक्षता घ्यावी. वाहतूककोंडीच्या ठिकाणी प्राधान्याने उपाययोजना करून रस्ते दुरुस्तीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नैसर्गिक नाले आणि सांडपाण्याच्या कामांमध्ये आढळलेल्या त्रुटी, अपूर्ण कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध पार्किंगच्या जागांचा सुस्पष्ट नकाशा तयार करून तो संबंधित उद्योग, वाहनचालक आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचवावा. कोणत्या उद्योगातील वाहनांसाठी कोणते पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी दिली.

चाकणचे सर्वंकष सर्वेक्षण

चाकण परिसरातील सर्व रस्ते, सांडपाणी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणात आढळलेल्या त्रुटींची नोंद करून त्यावर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना कराव्यात. कोणतीही बाब प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या.