पिंपरी : चाकणमधील घाटावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळाला. कात्रज येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हारण्या या बैलजोडीने मानाचा ‘महान भारतकेसरी’ किताब पटकावला आणि थार मोटार मिळवली.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नाईकवाडी यांच्या पुढाकाराने छकडी शर्यत बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चाकण येथील बैलगाडा घाटावर शर्यती पार पडल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यांमधून बैलगाडामालक सहभागी झाले होते. थार मोटार, टेम्पो, ट्रॅक्टर, ७० दुचाकी अशा भव्य बक्षिसांची उधळण यानिमित्ताने करण्यात आली. ६०० छकडी आणि ५० हजार बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा प्रत्यक्ष घाटात आनंद घेतला. पुण्यातील सुंदर आणि हारण्या, विट्यातील बब्या आणि बावऱ्या, वाघोलीतील सरपंच आणि २२११ पिस्टन या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तिसरा क्रमांक पटकाविला.
हेही वाचा >>>पुणे : पूर्ववैमनस्यातून गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून
बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्रातील शेतकरी, भूमिपूत्रांचे अतूट नाते आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेसह सर्वच संस्था, संघटना आणि शर्यतप्रेमींनी योगदान दिले आहे. हा शेतकऱ्यांचा थरारक खेळ टिकला पाहिजे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थचक्र सक्षम होत आहे. –महेश लांडगे, आमदार