ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचे मत

पुणे : सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये राजकीय आदेश झुगारून देत लोकशाही टिकवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शनिवारी व्यक्त केले. समकालीन प्रकाशनतर्फे मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि पोलीस अनुसंधान व विकास विभागाच्या निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. मीरा चड्डा-बोरवणकर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी बंग बोलत होते. आनंद अवधानी या वेळी व्यासपीठावर होते.

सत्तेची भीती वाटत असल्याने राज्यकर्त्यांचे आदेश ऐकण्याखेरीज व्यवस्थेला दुसरा इलाज नसतो. आम्हाला अराजक नको असेल तर राज्यघटनेचे ऐकण्याचे स्वातंत्र्य पोलीस दलाला दिले पाहिजे, असे बंग म्हणाले. दाते यांचे पुस्तक हे त्यांचे सत्याचे प्रयोग आहेत, असा गौरव करून बंग म्हणाले की, वारंवार टीका केल्याने व्यवस्था सुधारण्याचे मार्ग खुंटतात. त्यामुळे क्रांतिकारी नव्हे तर सुधारणावादी मार्गाने काम करण्यावर त्यांचा भर आहे.

बोरवणकर म्हणाल्या की, दाते यांचे पुस्तक पोलीस दलातील सेवा आणि व्यक्तिगत जीवनातील अनुभवांवर आधारित असूनही ते रंजक झाले आहे. दलामध्ये पोलीस अधिकाऱ्याला महत्त्व दिले जाते. पण शिपाई प्रथम हे सूत्र महत्त्वाचे आहे. दाते म्हणाले की, पोलीस व्यवस्थेकडे तटस्थतेने पण सहृदयतेने पाहिले, त्यातून हे लेखन आकाराला आले आहे. व्यक्ती आणि समाज यांमध्ये व्यवस्था हा दुवा आहे. समाज सुदृढ होण्यासाठी त्रुटी दूर करत या व्यवस्था बळकट कराव्या लागतील.