पावसाची उसंत

गेल्या आठवडय़ात कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उसंत घेतली आहे.

शुक्रवार-शनिवार कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

पुणे : गेल्या आठवडय़ात कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उसंत घेतली आहे. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाकडून आठवडा अखेरीस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पिवळा इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेच्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभावही कमी झाला आहे. परिणामी कोकणासह घाटमाथ्यावर गेल्या आठवडय़ात धुमाकू ळ घालणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतली आहे. हीच स्थिती बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी कायम राहणार आहे. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याचे हवामान विभागाकडून मंगळवारी सांगण्यात आले. या दोन्ही भागांना पिवळ्या श्रेणीचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांना शुक्रवारी नारंगी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी वेगवान वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शुक्रवार आणि शनिवारी मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पुण्यात चार मिलिमीटर, कोल्हापुरात एक मि.मी., महाबळेश्वरमध्ये १६ मि.मी. आणि साताऱ्यात चार मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोकण विभागात मुंबईत दोन मि.मी., अलिबागला सहा मि.मी., तर रत्नागिरीला अवघा दोन मि.मी. पाऊस पडला. विदर्भात के वळ गोंदिया जिल्ह्य़ात १४ मि.मी., तर मराठवाडय़ातील एकाही जिल्ह्य़ात पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. नांदेडमध्ये सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस, तर महाबळेश्वरला सर्वात कमी १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chance rain again western maharashtra including konkan friday saturday ssh

ताज्या बातम्या