पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने तीनही विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश बुधवारी लोकभवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे या वेळी उपस्थित होते. वर्मा यांच्या हस्ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ हायर अँड डिजिटल लर्निंग : इंडस्ट्री-ॲकॅडेमिया कोलॅबोरेशन फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयेबिलिटी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
राज्यपाल वर्मा म्हणाले, ‘कुलपती पदक’ हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व, नेतृत्व गुण, नवोन्मेष, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी, सामाजिक बांधिलकी आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारे असावे. पदकासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यापीठांनी पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित निकष निश्चित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी अधिक जवळून काम करण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी अधोरेखित केले.
अभ्यासक्रम, कौशल्यविकास, कार्यप्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांचा उद्योग व अर्थव्यवस्थेच्या गरजांशी मेळ घालण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा विश्लेषण, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, हरित तंत्रज्ञानासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती असावी, यावरही त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेची भावना निर्माण करून त्यांना अधिक उंच ध्येय निश्चित करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘कुलपतिपदक’ हे वर्गखोली, प्रयोगशाळा, क्रीडांगण, रंगमंच, समाजसेवा आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचे प्रतीक ठरावे, अशी राज्यपालांची भूमिका असल्याचे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नमूद केले.
सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यापीठांचा सहभाग
राज्यातील विद्यापीठांच्या सहभागासाठी राज्यपाल वर्मा यांनी क्षयरोगमुक्त महाराष्ट्र अभियान, नशामुक्त भारत अभियान, तसेच लोप पावणाऱ्या कला, पारंपरिक वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवन हे तीन महत्त्वपूर्ण उपक्रमही पुढे आणले आहेत. विद्यापीठे ही केवळ शिक्षणाची केंद्रे नसून, समाजाप्रति त्यांची व्यापक जबाबदारी आहे. त्यामुळे या उपक्रमांमध्ये विद्यापीठांनी सक्रिय भागीदार म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
