Chandrakant Patil Accident in Pune : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेलं पोर्श कार हिट अँड रन प्रकरण, मुंबईच्या वरळीतील व नागपूरमधील अपघातांची प्रकरणं अजून ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा असाच अपघात झाला आहे. या चारही अपघातांमध्ये चालकांनी मद्यप्राशन केलं होतं. सोमवारी (१६ सप्टेंबर) रात्री पुण्यात एका मद्यधुंद कारचालकाने थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील कारला धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र त्या कारमधील पोलीस व चालक जखमी झाले आहेत. मद्यधुंध कारचालक व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देत असताना एका मद्यधुंद कारचालकाने त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या कारला धडक दिली. या कारचालकावर ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हे ही वाचा >> आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
अपघातानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसांच्या व सुरक्षारक्षकांच्या कारला एका मद्यधुंद कारचालकाने धडक दिली आहे. माझी कार पुढे गेली आणि आमच्या ताफ्यातील दुसरी कार मागून येत होती. त्याच कारला धडक दिली. यावर गृहमंत्री काय करणार? तुम्ही माध्यमं उगीचच गृहमंत्र्यांवर टीका करताय.
हे ही वाचा >> पुण्यात विसर्जन मिरवणुकीत तातडीने मिळणार वैद्यकीय उपचार! आरोग्य विभागाचा उपक्रम जाणून घ्या…
चंद्रकांत पाटील म्हणाले, गृहमंत्री तिथे येऊन सांगणार का, की ही चंद्रकांत पाटलांची कार जात आहे या कारला कोणीही धडक देऊ नका. त्या घटनेनंतर धडक देणाऱ्या कारमधील दोघांना पोलिसांनी पकडलं आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे. आता यावरून तुम्ही प्रसारमाध्यमं विचारत आहात की गृहमंत्र्यांचा धाक निर्माण होणार आहे की नाही? पुण्यात काय चाललंय वगैरे… मुळात सरकारचा, पोलिसांचा धाक निर्माण होणं हा वेगळा विषय आहे आणि अशा प्रकारच्या घटनेनंतर कारवाई होणं हा वेगळा विषय आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरू केली आहे. तरीदेखील शहरात असे अपघाताचे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.