पुण्यात गुरुवारी एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका असे म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भाजपा सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार असा प्रश्नही सर्वांनाच पडला होता. मात्र खुद्द पाटील यांनीच आता आपल्या विधानाबद्दल खुलासा केला आहे.

पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, प्रसंग असा आहे की,  देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री यांनी यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. आता एवढंच म्हणतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत काही घटना घडेल. आता जे चाललंय ते चालूद्या.

या प्रकरणाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

देहूगाव येथे एका खासगी दुकानाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होते. उद्घाटन करण्याच्या अगोदर सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचं म्हटलं, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात येत होते.