भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे. पुण्यात देखील आंबेडकर जयंती त्याच उत्साहात साजरी केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी नागरिकांचीही एकच गर्दी झाली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भाजपाची बी टीम म्हटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते कुणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ते बोलत नाहीत. त्यांना जी मत मांडायची ती ते परखडपणे मांडतात. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात देखील मतं मांडलेली आहेत. महाविकास आघाडी आणि शरद पवार यांचं असं आहे की त्यांना बरं म्हटलं की बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला की न्याय, कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड, हे बरोबर नाही.”

“युतीबाबत मनसेचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही”

मनसेसोबत युती होणार का याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. “असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार करण्यासाठी आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ते देखील निर्णय करू शकत नाहीत. ते जास्तीत जास्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवतील. त्यामुळे तसा कोणताही निर्णय आत्ता नाही,” अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

हेही वाचा : “चंद्रकांत पाटलांनी मला पाहिलं आणि…”; वसंत मोरेंनी सांगितली जुनी आठवण, भाजपाच्या ऑफरबद्दल म्हणाले…

संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने सुरू आहे. त्यामुळे सरकारमध्ये असताना भाजपाचा त्याला पाठिंबा आहे. भारतरत्नची प्रक्रिया पूर्ण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना, महात्मा जोतिबा फुले यांना, अण्णाभाऊ साठे या सर्वांना भारतरत्न मिळालं पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे.”