भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं. “आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम असायचे, ख्रिश्चनीकरणामुळे ‘सेवन स्टेट’ हातातून जातील असं वाटायचं, पण अमित शाह यांनी दिलेल्या बुथ योजनेमुळे भाजपाच्या विजयाची किमया घडली,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना झोपून देत नव्हते, असंही नमूद केलं.

चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले, “बूथ हा शब्द अमित शाह यांनी दिला. ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना कुणाला झोपून देत नव्हते. ज्या आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे तो आसाम हातातून जाईल असं वाटत होतं. तो आसाम बूथ संपर्क योजनेमुळे आसाममध्ये एकदा नाही तर दोनदा विजय मिळाला. ज्या ईशान्य भारतातील सेवन सिस्टर स्टेट राज्ये ख्रिश्चनीकरणामुळे हातातून जातील असं वाटत होतं त्यातील त्रिपुरामध्ये सरकार आलं. नागालँड, मिझोराम, मेघालयातही सरकार आलं. ही किमया तुम्ही आम्हाला शिकवली. आता आम्ही कुणाला सोडत नाही.”

“भाजपा सोडून कुणालाच १०० चा आकडा पार करता आला नाही”

“२०१४ मध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपा सोडून कुणालाच १०० चा आकडा पार करता आला नाही. हे देखील बूथ योजनेमुळेच झालं. हे एकदाच झालं नाही, तर २०१९ मध्ये देखील तसंच झालं. त्यावेळी धोका देऊन सरकार बनलं नाही, पण १०५ आमदार निवडून आले. त्याआधी २०१४ मध्ये १२२ आमदार निवडून आले,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, कारण…”, चंद्रकांत पाटलांची मोठी मागणी

“जे पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहतात तेही ६० आमदारांच्या पुढे गेले नाही”

“जे पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहतात तेही ६० आमदारांच्या पुढे गेले नाही. ज्या काँग्रेसने देशावर राज्य केलं तेही ७० च्या पुढे गेले नाही. मोदींच्या नावावर मतं घेऊन नंतर धोका देणाऱ्या शिवसेनेला देखील कधी ७३ च्या पुढे आमदार निवडून आणता आले नाही. मात्र, भाजपाचे आमदार निवडून आले,” असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.