पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. सांस्कृतिक पैलू, तर्कावर आधारित विधायक प्रथा, परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी पाटील बोलत होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालक डॉ. किशोर इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव डॉ. प्रफुल्ल पवार या वेळी उपस्थित होते.
राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या चिठ्ठीवर पुरस्कार न देता केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आल्याचे सांगून पाटील म्हणाले, तरुण पिढीमध्ये भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकल पालक योजनेसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी एकल माता कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता असून, अशा कुटुंबांना व्यापक स्तरावर मदत मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
शिक्षक पुरस्काराची २०१२ मध्ये खंडित झालेली परंपरा १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत राज्यातील ४२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, गुणात्मक शिक्षण, शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे, असे डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले.
पुढील वर्षीपासून शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यासाठीही पुरस्कार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वाचा सहभाग असल्याने त्यांनाही आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात येणार आहे. तसेच नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देण्याची घोषणा पाटील यांनी केली.
