शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी विविध राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात येत आहे. सुषमा अंधारेंनी अलीकडेच शिवसेनेत पक्षप्रवेश केला असून त्यांच्याकडे उपनेते पद देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीची जबाबदारी दिल्यानंतर सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील लोकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे शिवसेनेत उरलेल्या इतर महिला नेत्यांच्या तुलनेत सुषमा अंधारेंची प्रसिद्धी अचानक वाढली आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.




हेही वाचा- “…हे अतिशय दुर्दैवी आहे”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
सुषमा अंधारे अंधारातून खूप प्रकाशात आल्या आहेत, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी सुषमा अंधारेदेखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. दोन्ही नेते पुण्यातील ‘विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रा’च्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला हजर राहिले होते. एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना चंद्रकांत पाटलांनी टोलेबाजी केली आहे.
सुषमा अंधारेंना उद्देशून चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्या सध्या अंधारातून खूप प्रकाशात आल्या आहेत. दिवसांतून चार-पाच वेळा त्यांना आपण टीव्हीवर पाहत आहोत. याला भाग्य म्हणतात. सहा-आठ महिन्यांपूर्वी सुषमाताई अशा प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हत्या,” असंही पाटील म्हणाले.