पुणे : ‘मंत्री असल्यामुळे पात्रता नसतानाही व्यासपीठावर बसायला मिळते. आपल्या हातून पुस्तकाचे प्रकाशन होत असते आणि आपल्यापेक्षा शंभरपट कर्तृत्ववान माणसे समोर बसलेली असताना त्यांच्यासमोर भाषण करण्याची संधी मिळते,’ अशी मिश्कील टिप्पणी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. ‘पण, कार्यक्रमाला उशिरा गेल्याचा तोटा असा होतो की आधीचे वक्ते काय बोलले आहेत याची कल्पना नसते.

त्यामुळे आपण काय बोलावे हे अनेकदा समजत नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. श्रीविद्या प्रकाशनच्या वतीने अरुण सावळेकरलिखित ‘मोहरले भावबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ-साहित्यिक डाॅ. न. म. जोशी, ‘सकाळ’चे सहसंपादक निरंजन आगाशे, नगरसेविका मीताली सावळेकर, श्रीविद्या प्रकाशनच्या संचालक श्रीती कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.

‘मराठीतील विविध शब्दांचे आणि म्हणींचे अर्थ या पुस्तकामध्ये दिले आहेत. माझ्यासारख्याला भाषण करताना उपयोगी पडेल, असे हे पुस्तक आहे. माझ्याकडे ग्रंथालय विभाग असल्याने राज्यातील सर्व ग्रंथालयांना मी हे पुस्तक घेण्यासाठी सूचना करेन. मी या पुस्तकाच्या शंभर प्रती विकत घेतो,’ असेही पाटील यांनी सांगितले.

जोशी म्हणाले, ‘प्राचीनत्व, ग्रंथसंपदा, लोकांमध्ये वापर आणि अन्य भाषांत विस्तार या निकषांवर मराठीला अभिजात दर्जा मिळाला. अभिजात भाषेसाठी केंद्राकडून भाषा विकासासाठी अनुदान मिळत असते. ते अद्यापही मिळालेले नाही. शहरातील प्रतिष्ठित शाळेमध्ये एका इयत्तेत २८०० मुले शिकत होती. आता जेमतेम ५०० मुले आहेत. याचे कारण आपल्यावर इंग्रजीचा प्रभाव आहे.

इंग्रजीविषयी मनातील दास्य काढून टाकणे आणि मराठीचा अभिमान बाळगणे, अध्ययन-अध्यापन आणि ग्रंथप्रकाशन यावर भर द्यावा लागेल.’
सावळेकर म्हणाले, ‘भाषा केवळ सहित्यापुरती मर्यादित नसते. तर, ती सर्वसामान्यांच्या ओठावर खेळत असते. भाषा बोलण्याचा न्यूनगंड असल्याचे जाणवते. ९४ उपबोली असलेली मराठी वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे. संवाद, वादविवाद, चर्चासत्र, परिसंवाद यातून मराठीचा पैस वाढेल.

आपल्याकडे ‘तळे राखी तो पाणी चाखी’ असे म्हटले जाते. मी सांगलीचा पालकमंत्री आहे. तेथील नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना ‘तळे राखी तो पाणी चाखी’ हे स्वाभाविक आहे. पण, चाखे म्हणजे सगळेत पिऊन टाक असे नाही. इतरांना काही शिल्लक ठेवायचे नाही, असे करू नका, हे मी नगरसेवकांना सांगितले. – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री