पुणे : राज्यातील सीसीएमपी पात्र आणि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनपेक्षित आणि ठाम भूमिका घेतली. डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर, “या न्याय्य मागण्यांवर निर्णय होईपर्यंत मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही,” अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे नेमके काय घडले आणि कोणत्या मागण्यांसाठी त्यांनी हा निर्धार व्यक्त केला, याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शनिवारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सीसीएमपी पात्र डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी, शासकीय आरोग्य सेवेत समावेश, डॉ. सावरीकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीची प्रलंबित निवडणूक तसेच विविध शासकीय योजनांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समान संधी देण्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.
‘सत्कार नको, आधी प्रश्न सोडवा’
डॉक्टरांच्या व्यथा ऐकल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भावनिक आणि ठाम भूमिका घेत, “जोपर्यंत या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही,” असे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेची डॉक्टर संघटनांकडून जोरदार दखल घेण्यात आली आहे.
अधिवेशनात करणार पाठपुरावा
या सर्व मागण्यांबाबत येत्या विधिमंडळ अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येईल. संबंधित विभागांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
या बैठकीस उद्योजक समीर पाटील, स्मिता पाटील, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड आणि प्रदेश सचिव डॉ. अजय तायडे पाटील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील सीसीएमपी आणि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता शासनस्तरावर सकारात्मक हालचाली होतील, अशी अपेक्षा डॉक्टर संघटनांनी व्यक्त केली आहे.
