chandrakant patil replied to nana patole statement on kasbapeth byelection spb 94 | Loksatta

“…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान

कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.

chandrakant patil, nana patole,
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. दरम्यान, पटोलेंच्या या विधानाचा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – भाजपला ब्राह्मण उमेदवारांचे वावडे? ‘कोथरूड’ पाठोपाठ ‘कसब्या’तही डावलले

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिकळांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच “नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – “मी निवृत्ती महाराज इंदोरीकरांना एवढाच इशारा देऊ इच्छितो”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर उपस्थितांमध्ये पिकला हशा

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

रविवारी कसबापेठ पोटनिवडणुकीबाबत बोलताना, “मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी अशी विनंती केली. मात्र, कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही कसब्याची जागा लढवणार असल्याचे मी त्यांना सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती. तसेच “प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत मी स्वत: लक्ष देत असून ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे”, असंही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:36 IST
Next Story
Kasba Assembly By-Election : “…याचे निश्चितपणे परिणाम दिसणार” काँग्रेस नेते रोहित टिळकांचं सूचक विधान!