पुणे : ‘मराठा आरक्षणाच्या मागणीचे नेते मनोज जरांगे यांना माझ्या व्यंगावर किंवा शरीरावर बोलून आनंद मिळत असेल किंवा त्यातून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी टिंगलटवाळी करावी,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांच्या टीकेला उत्तर दिले.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची बैठक घेतली. त्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मी कधीही मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादात पडलेलो नाही. मी कोणाबद्दलही आकस ठेवलेला नाही. माझ्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि व्यंगावर टीका करून जरांगेंना आनंद वाटत असेल, किंवा त्यातून मराठा समाजाला न्याय मिळतोय असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी माझे विडंबन आणि टिंगलटवाळी नक्कीच करावी. मला त्याचे काहीही वाईट वाटणार नाहीस,‘ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत २२ लाख २० हजार ५०० कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे दिली आहेत. या दाखल्यांपैकी केवळ एका दाखल्याबाबत तक्रार आल्यामुळे ७ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कोणताही दाखला रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते. महसूल खात्याने एकही दाखला रद्द केलेला नाही. जात वैधता देणे हे सामाजिक न्याय विभागाचे काम असते. महसूल खात्याचे काम फक्त प्रमाणपत्र देणे आहे,’ असेही प्रत्युत्तर त्यांनी जात प्रमाणपत्र रद्द केल्याच्या आरोपांना दिले. ‘जरांगे यांचा जेव्हा जेव्हा मला फोन आला, तेव्हा मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. पण, एका पत्रावरून गैरसमज पसरवला गेला,’ असेही ते म्हणाले.

‘माझ्यावर जातीयवादाचा अथवा अन्यायाचा आरोप केला जातो. माझी पत्नी कुणबी आहे, तर सून मराठा आहे. माझ्या स्वतःच्या घरात मराठा, कुणबी आणि तेली असा कोणताही भेद नाही. ज्या घरात स्वतः सून मराठा आणि बायको कुणबी आहे, तो माणूस मराठा समाजावर कसा अन्याय करील? मी कधीही कोणत्याही जातीत भेद केलेला नाही,’ असेही त्यांनी सांगितले.