पुणे : ‘नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये झालेला पराभव मान्य आहे. मात्र, पदवीधरांची पहिल्या क्रमांची सर्वाधिक मते भाजपलाच मिळाली आहेत. ईव्हीएमवर मतदान झाले असते, तर एकच मत द्यावे लागले असते. त्यामुळे बॅलेट पेपरवरही एका अर्थी भाजपचाच विजय झाला आहे,’ असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. ‘नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयाने काँग्रेसने अभिमानात जाऊ नये. संपूर्ण देशामध्ये एखादी जागा जिंकले म्हणून, त्यांना खूप काही मिळाले नाही. नागपूरची जागा यापूर्वीही त्यांच्याकडेच होती. तिथे जिंकण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही जागा जिंकण्याऐवढे प्राबल्य आमच्याकडे होते. मात्र, आम्ही पराभव मान्य केला आहे. पराभवाची कारणे शोधू,’ असेही त्यांनी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदीरात डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या संकल्पपूर्ती कार्यक्रमानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, ‘सुधाकर कोर्डे यांच्यासाठी भाजपची संघटीत शक्ती कामाला लागलेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निवडणुकीत भाग घेतला. मात्र, इतर ३८ उमेदवारांची दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मते काँग्रेसला मिळाली, त्यामुळे त्यांना जिंकता आले.’
‘संपूर्ण देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, तरी भाजप जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवरही संपूर्ण देशात काँग्रेस हरली आहे. राज्यातील एक जागा काँग्रेसने जिंकली. त्याचा अर्थ ते बॅलेट पेपरवर जिंकले, असा होत नाही. संपूर्ण देशात काँग्रेस हरलेली आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार-खासदार निवडून आले, त्या ठिकाणी मशीन चांगली, आम्ही जिंकलो तर मशीन खराब. हा खोटारडेपणा आहे,’ अशी टिकाही बावनकुळे यांनी केली.
‘संपूर्ण निकालाच्या चिंतनाची आवश्यकता’
‘विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील नागपूर आणि पुण्याच्या जागा भारतीय जनता पक्षाला अत्यंत प्रतिष्ठेच्या होत्या. या जागा जिंकण्यासाठी तयारीही केलेली. संघटनेचे कार्यकर्ते, पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रत्येक पदवीधरांना भेटले. मात्र, काही तरी कमी राहिले. या संपूर्ण निकालाचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे मतदान मी कधीच बघितले नाही. प्रत्येक मत कुठे गेले, त्याची कारणे काय होती, मतदानाचा कल आदी गोष्टी या निवडणुकीतून शिकण्यासारख्या आहेत,’ असेही बावनकुळे यांनी सांगितले.
