पुणे : ‘कर्जतसारखे ५० प्रकल्प राज्यात आले पाहिजेत. हा प्रकल्प उभारण्यात दिल्ली-मुंबईमधून कोणताही दबाव नाही,’ अशी भूमिका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘टोरंट’ कंपनीच्या कर्जत येथील जलविद्युत प्रकल्पाच्या समर्थनार्थ गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. ‘या जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणे म्हणजे, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाला विरोध करणे आहे. ही विकासविरोधी प्रवृत्ती आहे,’ अशी टीकाही त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून केली. बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या संकल्पपूर्ती कार्यक्रमानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी उपस्थित होते.
‘झाडांचे संवर्धन केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनही झाले पाहिजे. मात्र, कर्जत प्रकल्प समजून घेतला पाहिजे,’ अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली. ते म्हणाले, ‘कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आणि घरगुती ग्राहकांना प्रति युनिट दीड रुपये किमतीने वीज मिळते. कोळशाच्या विजेचा दर ८ रुपये युनिट आहे. तर जलविद्युत प्रकल्पांमधून मिळणाऱ्या विजेचा दर केवळ दीड रुपये युनिट आहे.’
‘राज्याच्या जनतेला, शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची असेल, तर जलविद्युत प्रकल्प करावे लागतील. जलविद्युत प्रकल्प हे शंभर टक्के पर्यावरण पूरक असतात. त्यांचा त्रास होत नाही. याउलट, कोळशावर आधारलेल्या वीजनिर्मिती केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. कोळसा प्रकल्प असलेल्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूरमध्ये एक मिनिटही उभे राहता येत नाही. वीज प्रकल्पापासून शंभर मीटर अंतरावर माझे घर आहे. माझ्या घरावरही एक किलो राख असते. मात्र, संपूर्ण राज्याला वीज द्यायची आहे. उद्या आम्ही नागपुरात, आमच्या घरांजवळ ३ हजार मेगावॉटचा वीजनिर्मिती प्रकल्प होऊ दिला नाही, तर राज्य अंधारात जाईल. राज्यातील जनतेला वीज मिळाली पाहिजे, ती पश्चिम महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, पुण्याला मिळाली पाहिजे. याच विचारावर हे आम्ही प्रकल्प उभारले,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘चंद्रपूर नागपूरमध्ये कोळशावर आधारलेले प्रकल्प आहेत. तिथे जवळच कोळसा खाणी आहेत. पुण्यात जसे कोळशावर आधारलेले प्रकल्प टाकता येत नाहीत, तसे जलविद्युत प्रकल्प नागपूरमध्ये उभारता येत नाहीत. जलविद्युत प्रकल्पांसाठी सह्याद्री, सातपुड्यासारखा भूभाग लागतो. हिमालयातही जलविद्युत प्रकल्प आहेत. संपूर्ण उत्तर भारत, जम्मू-कश्मीर जलविद्युत प्रकल्पांवर आहे. कर्जतचा प्रकल्प उभारला, तर आपणही विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकू. कोळशाचे प्रकल्प बंद पडले पाहिजेत. सौर ऊर्जा, पवनऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पच सुरू राहिले पाहिजेत. ही काळाची गरज आहे. जागतिक तापमानवाढीचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे,’ असेही बावनकुळे यांनी सांगितले.
‘झाडांसाठी जागा देऊ’
‘कर्जतच्या जलविद्युत प्रकल्पातून शून्य प्रदूषण होणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. या प्रकल्पासाठी जेवढी झाडे तोडली, त्यापेक्षा दहा पट, शंभर पटींनी अधिक रोपे लावली पाहिजेत. ती पुणे जिल्ह्यातच, भीमाशंकरच्या काठावरच लावली पाहिजेत. त्यासाठी जागा शोधली पाहिजे. महसूल विभागाची जागा घेतली पाहिजे, शेती महामंडळाकडे, वनखात्याकडे असतील, त्या सर्व जागा रोपे लावण्यासाठी समर्पित करू,’ अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
