पुणे : ‘एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा महायुतीतल्या कोणत्या घटक पक्षाने कोणाचे काम केले नाही, याचे आकलन करू. पक्षाच्या नेतृत्वाने सांगितल्यानंतरही, कोणत्या व्यक्तीकडून पक्षविरोधी, महायुती विरोधात काम झाले असेल, तर त्याला समज देऊ,’ असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात एका कार्यक्रमानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये मात्र मैत्रीपूर्ण लढत होती. या लढतीत आम्ही विजयी झालो. इतर ठिकाणी मात्र मित्र पक्षांनी साथ दिली नसेल, तर त्याचे आकलन करू. त्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे प्रमुख नेते चर्चा करतील.’

‘शिंदेंनी धंगेकरांना समज द्यावी’

‘राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, अशा विषयात बोलण्याची रविंद्र धंगेकर यांची उंचीच नाही. एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना समज द्यावी, अशी खरमरीत टिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विधानसभेत भाजपला आणि महायुतीवर जनतेने विश्वास दाखवला आहे. जनतेचा कल घेतला, तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाकडे आहे, होता आणि म्हणूनच ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मागितली होती. मात्र, यापूर्वीही भारतीय जनता पक्षाने पुण्यातून निवडणूक लढली होती. त्या वेळी आम्ही पराभूत झालो. मात्र, विधानपरिषदेचे विद्यमान आमदार अरुण लाड भाजपमध्ये आले. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रत्येकवेळी पदवीधरांची मतदार यादी बदलणे चूक’

‘पदवीधर मतदारांची यादी प्रत्येकवेळी बदलण्याची गरज नाही. एकदा पदवी मिळाली की, तो मतदार पुढे प्रत्येक निवडणूकीसाठी पात्र असतो. त्यामुळे दरवेळी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. यादी तशीच ठेवावी. त्यातले काहींचे मृत्यू झाले किंवा पत्ते बदलले, तर तेवढेच बदल यादीत करावेत. नव्याने पदवी मिळालेल्या मतदारांसाठी नोंदणी सुरु ठेवावी. मात्र, प्रत्येक वेळी नवी मतदार यादी बनवणे हे पटण्यासारखे नाही. याबद्दल निवडणूक आयोगालाही कळवणार आहे,’ अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.