आज संजीवन समाधी दिन सोहळा

पुणे : द्वादशीनिमित्त आळंदीत हरिनाम गजरात माउलींचा रथोत्सव साजरा झाला. रथोत्सवात दिवसभर पाऊस बरसत होता. गुरुवारी (२ डिसेंबर) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होणार आहे.

भाविकांनी भक्तिमयरसात चिंब होत रथोत्सवात श्रींचे दर्शन घेतले. द्वादशीला अवकाळी आलेल्या पावसाने सोहळय़ात नागरिक आणि व्यापाऱ्यांची काही वेळ तारांबळ झाली. काही दिंडय़ांनी पावसात भिजत प्रदक्षिणा पूर्ण केली. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून श्रींचे रथोत्सवात ग्रामस्थ, भाविकांनी दर्शन घेतले. श्री राधाकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली. रथोत्सवास परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींचे रथोत्सवात सहभागी झाले होते.

श्रींची पूजा होताच माउलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी या वर्षी पुष्प सजावट केलेल्या रथात ठेवण्यात आला. दरम्यान, श्रींचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडीतून भगव्या पताका उंचावत हरिनाम गजर करीत रथोत्सव झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक मार्गे हरिनाम गजरात झाली. मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. मंदिरात प्रदक्षिणा, धूपारती झाली. दरम्यान, वीणा मंडपात हरिभाऊ बडवे, केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने

कीर्तन सेवा झाली. पालखी सोहळय़ाचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, व्यवस्थापक माउली वीर, श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, रामभाऊ चोपदार, मानकरी साहिल बाळासाहेब कुऱ्हाडे, मंगेश आरू, योगेश आरु आदी त्या वेळी उपस्थित होते.

संजीवन समाधी दिनी विविध कार्यक्रम

 ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिकी यात्रा २०२१ अंतर्गत संजीवन समाधी दिन सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत गुरुवारी अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे. या निमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळय़ाचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराय यांच्या वंशजांच्या परिवारातर्फे होणार आहे. तत्पूर्वी माउली मंदिरात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते श्रींना पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळय़ातील कीर्तन होणार आहे. महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षांव, आरती आणि घंटानाद होणार आहे. सोपानकाका देहूकर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांच्या वतीने हरिजागर होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.