पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले सनदी अधिकारी, शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून तपासही पूर्ण झाल्याचे नमूद करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. पत्रावळे यांनी खोडवेकर यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर (वय ४३) गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे आढळून आले होते. खोडवेकर यांनी या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यासाठी पैसे घेतले, अशी माहिती शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी चौकशीत दिली होती. त्यानंतर या प्रकरणात २९ जानेवारी रोजी खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. खोडवेकर यांच्या वतीने अँड. एस. के. जैन, अँड. अमोल डांगे, अँड. अमेय गोऱ्हे, अँड तन्मय गिरे यांनी बाजू मांडली. प्रथम माहिती अहवालात (एफआरआय) खोडवेकर यांचे नाव नाही. त्यांच्याकडून मोबाइल, पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला होता. त्या शिवाय खोडवेकर यांच्याकडून अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले नाही. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून खोडवेकर यांचा जामीन मंजूर करण्याची विनंती अँड. एस. के. जैन आणि अँड अमोल डांगे यांनी युक्तिवादात केली. त्यानंतर खोडवेकर यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.