राज्यातील २० हजार ६०० वकिलांचे अर्ज

न्यायालयाच्या आवारात तोतया वकिलांकडून पक्षकारांची फसवणूक होण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा घटनांना आळा बसावा यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने सुरू केलेल्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत राज्यातून २० हजार ६०० वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुण्यातील चार हजार वकिलांच्या अर्जाचा समावेश आहे.

तोतया वकिलांना आळा घालण्यासाठी बार कौन्सिल इंडियाने सनद पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. राज्यामध्ये सव्वा लाख वकील आहेत. पुण्यात सुमारे तेरा हजार वकील आहेत. त्यानुसार महाराष्ट्र आणि गोव्यातील वकिलांची सनद पडताळण्याची जबाबदारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या वकिलांच्या संघटनेवर सोपविण्यात आली आहे. सनद पडताळणीच्या मोहिमेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.

या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, पुण्यात आतापर्यंत १७ तोतया वकिलांना पकडण्यात आले आहे. सनद पडताळणीची नियमावली आणि अर्ज तयार करण्यात आले आहेत. त्या अर्जावर वकिलांचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता याचा उल्लेख आहे. जमीन व्यवहार तसेच विविध शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या वकिलांची सनद पडताळणी करण्यात येणार आहे. खासगी फर्म चालविणाऱ्या वकिलांची सनद पडताळणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त वकिलांनी सनद पडताळणी करून सहकार्य करावे.

देशात ३० टक्के वकील तोतया

देशात ३० टक्के वकील तोतया असल्याचे वक्तव्य बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष रतन शहा यांनी केले होते. सर्वोच्च न्यायालयात तोतया वकिलांचा वावर असल्याचे उघड झाल्याने पडताळणीच्या नियमांनुसार (व्हेरिफिकेशन रूल) सनद पडताळणी करून घ्यायची होती. त्यानुसार, बार कौन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील वकिलांची सनद पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दिल्ली आणि कर्नाटक उच्च न्यायालयात सनद पडताळणीच्या विरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सनद पडताळणी मोहिमेला स्थगिती दिली होती. या मोहिमेच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सनद पडताळणी मोहिमेस परवानगी दिली होती. त्यानुसार बार कौन्सिल आणि पुणे बार असोसिएशनच्या वतीने सनद पडताळणीचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे.