लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. समाज नैतिकदृष्ट्या खूप पुढे गेला आहे. बऱ्याच बेड्या आता कोसळून पडल्या आहेत. मात्र, काम अजूनही पूर्ण झालेले नाही. सामाजिक समतेच्या लढ्यात पुढे जाण्यासाठी चवदार तळे दीपस्तंभासारखे आहे,’ असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, विवेक विचार मंच, डॉ. आनंद यादव अभ्यास मंडळ आणि साने गुरुजी तरुण मंडळ यांच्यातर्फे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या क्रांतीदिनानिमित्त ‘सामाजिक समतेचा लढा’ या विषयावर व्याख्यान आणि डॉ. गौरव घोडे यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात रावत बोलत होते. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य धोंडीराम पवार, ॲड. क्षितिज गायकवाड, ॲड. प्रशांत यादव, अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे, सुधाकर अहिरे या वेळी उपस्थित होते.
रावत म्हणाले, ‘हजारो वर्षे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या परंपरेला आव्हान देण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होती. समाजमन बदलण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. लोकांना पुनर्विचार करायला भाग पाडले. ’
ॲड. क्षितीज गायकवाड म्हणाले, ‘आंबेडकरी चळवळीला जोडणारी माणसे पाहिजेत, तोडणारी नव्हे. सध्या राज्यघटना रक्षणाच्या नावाखाली वाटेल ते खेळ चालले आहेत. शिवराळ भाषा आणि मारहाणीने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या करुणेच्या मार्गावरच ही चळवळ पुढे जायला हवी. बाबासाहेबांनी कुणाचाही द्वेश केला नाही. त्यांनी इथल्या मातीतल्या करूणेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचे तत्व सांगितले. मात्र, आता काही लोक आंबेडकरी चळवळीतील तरूणांची माथी भडकवण्याचे काम करित आहेत. त्यांनी स्वतःची चळवळ सुरू करावी. आंबेडकरी चळवळीत येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनी माथी भडकवणाऱ्या लोकांच्या नादी न लागता बाबासाहेबांचे मूळ लेखन वाचायला हवे. बाबासाहेबांचे खरे विचार समजून घेत काम करायला हवे. बाबासाहेबांचे-बुद्धांचे नाव घेतो, तर त्याला साजेसे वर्तनही केले पाहिजे.’
डॉ. गौरव घोडे यांनी सन्मानाप्रती आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. सुधाकर अहिरे यांनी आभार मानले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.