पुणे शहरात सर्व रस्त्यांना खड्डे पडलेले असताना महापालिकेकडे मात्र १२ रस्त्यांनाच खड्डे पडल्याचा अहवाल सादर झाला आहे. खड्डे तपासणीसाठी महापालिकेने नेमलेल्या त्रयस्थ कंपनीने ज्या ११८ रस्त्यांची तपासणी केली, त्यातील फक्त १२ रस्त्यांनाच खड्डे असल्याचा अहवाल कंपनीने दिला असून या अहवालामुळे खड्डे प्रकरणी ठेकेदारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता मावळली आहे.
महापालिकेने खड्डे तपासणीचे काम ‘इंजिनियर्स इंडिया लिमिटेड’ या त्रयस्थ कंपनीला दिले होते. महापालिकेने गेल्या तीन वर्षांत ज्या रस्त्यांचे पुनर्डाबरीकरण केले आहे अशा ११८ रस्त्यांची तपासणी करण्याचे काम कंपनीने गेल्या काही दिवसांत केले. या ११८ रस्त्यांसाठी महापालिकेने ८७ कोटी ७८ लाख रुपये खर्च केले आहेत. रस्त्यांच्या तपासणी अहवालाच्या आधारे ज्या ठेकेदारांची कामे दोषयुक्त आढळतील त्यांच्यावर महापालिका कारवाई करणार आहे. कंपनीचा अहवाल आता महापालिकेला प्राप्त झाला असून ११८ पैकी फक्त १२ रस्त्यांवरच खड्डे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अन्य काही रस्त्यांना खड्डे आढळले असले, तरी महापालिकेने तेथे कोणत्या ना कारणासाठी खोदकाम केल्यामुळे त्या खड्डय़ांना संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरता येणार नाही, असेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या बारा रस्त्यांपैकी बहुतांश कामे गेल्या किंवा चालू वर्षांत झाली असून या रस्त्यांसाठी सरासरी ४० लाख ते दीड कोटी एवढा खर्च झाला आहे. महमंदवाडी ते कोरिएन्थन क्लब, डीपी रस्ता, दत्तनगर ते जांभूळवाडीपर्यंत, भोईराज भवन-कसबा पेठ परिसर, महाराणा  प्रताप रस्ता मीठगंज पोलीस चौकी-महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, भारती विद्यापीठ व कात्रज परिसर, औंध-सर्जा हॉटेल व परिसर, बाणेर गावठाण सर्वेक्षण क्रमांक २८ ते ६२ ते वारजे महामार्ग, प्रभाग ६१ तपोवन व बावधन परिसर ते डावी भुसारी कॉलनी, सहजानंद सोसायटी ते आशिष गार्डन, एकलव्य कॉलेज परिसर ते महात्मा सोसायटी हे बारा रस्ते असून त्यांना खड्डे पडल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
अहवालात यांच्यावर ठपका
इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या अहवालात ज्या रस्त्यांना खड्डे आढळले आहेत, त्यांच्या ठेकेदारांचीही माहिती देण्यात आली आहे. या बारा रस्त्यांची कामे सनशाइन व्हेंचर्स, ठक्कर कन्स्ट्रक्शन, टी. जी. धमानी, एस. के. येवले आणि कंपनी, देवकर अर्थ मूव्हर्स, मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन, त्रिमूर्ती स्टोन मेटल कंपनी, बी. व्ही. पासलकर यांना देण्यात आली होती. सर्व रस्त्यांचा गुणवत्ता हमी कालावधी अद्यापही शिल्लक असून त्यानुसार ते ठेकेदारांकडून दुरुस्त करून घेतले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.