काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक नेते मंडळी सत्ताधारी भाजप, सेनेत जात आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत राहणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेत एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना शिवसेनेत छगन भुजबळ जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अनेक वर्ष आमच्या सोबत राहिलेले नेते मुलाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी भाजप आणि सेनेत जात आहेत. तिथे गेल्यावर राज्याच्या विकासासाठी आम्ही या पक्षात आल्याचे सांगतात. हे पाहून किमान जनतेच्या हितासाठी तरी जात आहेत. एवढे ऐकून तरी मला समाधान मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करून पुन्हा उभा राहिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी आजवर घात करण्याचे काम केले आहे अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील आणि आमचे आजवर कौटुंबिक संबध आहेत. आम्ही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यावर कधीच अन्याय केला नाही. तसेच त्यांनी जे काल विधान केले हे धक्कादायक असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण हर्षवर्धन पाटील यांचा फोन लागत नाही. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या जागेची अद्याप चर्चा देखील झाली नसल्याची त्यांनी सांगितले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका करतात. शरद पवार यांनी मागील ५० वर्षात राज्यासाठी काय केले आहे. हे बाहेरच्या व्यक्तीने येऊन सांगण्याची गरज नाही. कारण राज्यातील जनतेला माहिती आहे की शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या विधानाचा समाचार घेतला.