खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे आवाहन
अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधीही जात आणि धर्म मानला नाही. ते कोणत्याही एका जातीचे नव्हते, तर सर्वाचे होते. त्यामुळे कोणी त्यांना जातिधर्मामध्ये अडकवू नये, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सदस्य विवेक यादव, विनोद मथुरावाला,अशोक पवार, दिलीप गिरमकर, डॉ. किरण मंत्री, रूपाली बिडकर, प्रियंका श्रीगिरी आदी या वेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले, की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची महाराष्ट्र ही राजधानी आहे. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी काय केले, याची माहिती सर्वाना आहे. त्यांनी जात—पात आणि धर्मभेद मानला असता तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराजांनी सर्व जातींच्या लोकांना सोबत घेऊनच स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे ते सर्वाचे आहेत.
ब्रिगेडियर सेठी म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या राजनीती, रणनीती, युद्धकौशल्य आणि गुणांचे आचरण केले पाहिजे.
पुतळा उभारण्याचे काम करणारे वास्तुविशारद आणि दोन हजार ५०० किलो वजनाच्या पंचधातूचा पुतळा तयार करणारे शिल्पकार महेंद्र थोपटे, मुस्लीम को-ऑप. बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, बोर्डाचे सर्व सदस्य, पुतळा उभारण्यासाठी काम करणारे कर्मचारी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. बोर्डाचे सदस्य विवेक यांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांना या वेळी चांदीची तलवार भेट देण्यात आली. दिलीप गिरमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. डी. एन. यादव यांनी प्रास्ताविक, तर अतुल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.