मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात गोवरच्या साथीचे रुग्ण वाढत आहेत. गोवरची साथ झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली असली, तरीही साथ आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील चौथीपर्यंतच्या वर्गांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाधव म्हणाले,की मुंबईपाठोपाठ आता पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्येही गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताळणे हाताबाहेर जाईल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून गोवरची साथ नियंत्रणात राखण्यास मदत होईल. ज्या शहरांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत, त्या शहरांमधील प्ले ग्रुप, नर्सरी, केजी, पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व वर्गांना सुटी जाहीर करावी, जेणेकरून साथ नियंत्रणात राखण्यास मदत होईल.

या बाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गोवर साथीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गोवरची साथ आणखी वाढण्याची वाट पाहात बसलो, तर नंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच पावले उचलावीत, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhava maratha organization demands to the chief minister to give vacation to classes up to 4th to control the outbreak of measles pune print news dbj 20 amy
First published on: 10-12-2022 at 13:43 IST