पुणे : पावसाने पाठ फिरवली आहे. उष्णता वाढली असून, पक्ष्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोंबड्यांची आवक २० टक्के कमी झाली आहे. मागणी वाढल्याने चिकनच्या दरात किलोमागे ३० रुपयांनी वाढ झाली.

 ‘नवरात्रोत्सवापूर्वी सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला मागणी वाढली. मागणी वाढल्याने सुरमई, पापलेट या मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली. पावसाने पाठ फिरवली आहे. उष्णता वाढली असून, पक्ष्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोंबड्यांची आवक २० टक्के कमी झाली आहे.

मागणी वाढल्याने चिकनच्या दरात किलोमागे ३० रुपयांनी वाढ झाली. गावरान अंड्याच्या दरात शेकड्यामागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ५ रुपयांनी वाढ झाली,’ असे पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

‘यंदा अधिक मास, नंतर श्रावण मास आणि गणेशोत्सवात सामिष पदार्थ अनेकांकडून वर्ज्य करण्यात आले. गेल्या शुक्रवारी (२५ सप्टेंबर) गणेशोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर रविवारी (२७ सप्टेंबर) मटण, मासळी, चिकनच्या खरेदीसाठी गर्दी झाली. रविवारीदेखील (४ ऑक्टोबर) मटण, मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली. मटणाचे दर स्थिर राहिले,’ अशी माहिती पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

‘नवरात्रोत्सव पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याने  मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर गेल्या रविवारी मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. सुरमई, पापलेटच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली. हलव्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, खाडीतील मासळीची ४०० ते ५०० किलो, नदीतील मासळीची ५०० ते ७०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सीलन या मासळीची एकूण मिळून २० ते २५ टन एवढी आवक झाली,’ अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

पापलेट – ९०० ते १८०० रुपये

हलवा – ६०० ते ७०० रुपये

सुरमई – ४०० ते ९०० रुपये

रावस – ८०० ते ९०० रुपये

मटण – ८४० रुपये चिकन – २५० रुपये