scorecardresearch

पुण्यात मुख्यमंत्र्यांचा ‘दरबार’

कसबा पेठेतील फडके हौद चौकातील गुजराथी शाळेमध्ये शिंदे यांनी विविध समाज घटकांबरोबर संवाद साधला.

पुण्यात मुख्यमंत्र्यांचा ‘दरबार’
मुख्यमंत्र्यांचा ‘दरबार’

अविनाश कवठेकर, लोकसत्ता

पुणे : ‘साहेब, कित्येक वर्षांपासून कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत.. तुमच्यामुळे यंदा आमचा ख्रिसमस जल्लोषात झाला.. साहेब, आमच्या समाजाला मोठय़ा सवलती नको, मात्र मुलांच्या शिक्षणासाठी काही सवलतींचा विचार करावा.. अशा आशयाचे संवाद सुरू होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या अठरा पगड जातींच्या शिष्टमंडळांच्या ‘दरबारामध्ये’! 

‘सरकार जनतेचे आहे ना ? आठ महिन्यांत तुम्ही ते अनुभवले ना ? सर्वच समाजाच्या मागे भाजप-शिवसेना सरकार खंबीरपणे उभे आहे की नाही ? आठ महिन्यात कधी कोणावरही अन्याय झाला का ? ’ अशी थेट विचारणा उपस्थितांना करताना आणि उपस्थितांकडून  ‘अपेक्षित’ उत्तर वदवून घेत मुख्यमंत्री  विविध समाज घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतानाच कसब्यात भाजप-शिवसेना युतीला मतदान करण्याचे आवाहन करतात.

संबंधित समाजातील किती मतदार ‘कसब्यात’ रहातात याची आपुलकीने विचारणा करताना नातेवाईक आणि मित्र मंडळांमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करा, असे सूचितही करतात. निवडणुकीनंतर कोणी कोणाला मतदान केले, हे मला कळेलच, असा गर्भित इशाराही ते ‘दरबारात’ देतात.

आता दस्तुरखुद्ध मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणजे  काही झाले तरी प्रश्न मार्गी लागणारच, या ‘भाबडय़ा’ विश्वासावर मुख्यमंत्र्यांचाच जयघोष करत समाज घटक दरबारातून मार्गस्थ होतात. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विविध न्याती संस्था-संघटना, समाज घटकांबरोबरच्या संवादाचे हे  चित्र !

कसबा पेठेतील फडके हौद चौकातील गुजराथी शाळेमध्ये शिंदे यांनी विविध समाज घटकांबरोबर संवाद साधला. प्रश्न, समस्या मार्गी लागणार या भाबडय़ा विश्वासाने परिसरात दुपारी चार वाजल्यापासूनच हातात निवेदनांचे कागद, सत्कारासाठी शिवधनुष्य, पुणेरी पगडी, हार-तुरे, पुष्पगुच्छ घेऊन समाज घटक मुख्यमंत्र्यांची दुपारपासून प्रतीक्षा करत असतात. मात्र या संवादामागचा ‘छुपा’ हेतू फक्त शिष्टमंडळातील मोजक्या प्रतिनिधींनाच माहिती असतो. हीच बाब मुख्यमंत्री अचूक हेरतात.

कधी कोणाला नाव विचारत, त्यांच्याबरोबर छायाचित्र काढत, संबंधित समाजाचा नेता किती जवळचा आहे, हे सांगत प्रश्न, समस्या सुटतील, असा विश्वास ते निर्माण करतात. ‘कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे निर्णय घेता येणार नाही. कारण, निर्णय घेतला तर तुम्ही-आम्ही सगळेच अडचणीत येऊ, पण काळजी करू नका, मी बरोबर आहे असा विश्वास देतात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 03:12 IST