पुणे : शाळेत भुताचा वावर असल्याच्या उठलेल्या आवईने चिखलदरामधील अवघी डोमा आश्रमशाळा हादरली होती. भयाने ग्रासलेल्या आदिवासी मुलींनी घरची वाट धरली आणि गजबजलेली शाळा अचानक ओस पडली. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तत्पर हस्तक्षेपाने आणि तीन दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रबोधनाने हे कथित ‘भूत’ दूर पळाले आणि मुली पुन्हा शाळेच्या वाटेवर आल्या! चिखलदरा येथील डोमा आश्रमशाळेत सुरुवातीला एका मुलीला झालेल्या शारीरिक-मानसिक त्रासातून आश्रमशाळेला ‘भुताने झपाटले’ अशी अफवा पसरली.

इतर मुलींमध्येही त्यामुळे भीतीची साखळी निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून १० ऑगस्ट रोजी ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नंदिनी जाधव (पुणे), प्रा. प्रवीण देशमुख (मुंबई) आणि रामभाऊ डोंगरे (नागपूर) यांनी डोमा आश्रमशाळेला भेट दिली. मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पथकाने केवळ औपचारिक भेट न देता थेट आश्रमशाळेतच रात्रभर मुक्काम ठोकला आणि मुलींच्या मनातील भीतीचा कणा मोडून काढला.

‘अंनिस’च्या पथकाने ११ ते १३ ऑगस्टदरम्यान एकताई, चुनखडी, पाचडोंगरी, खडीमल आणि बुटीदा या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मुलींच्या घरी प्रत्यक्ष संवाद साधला. या पाहणीतून मुख्य कारणे समोर आली. सुरुवातीला एका मुलीला झालेल्या शारीरिक-मानसिक त्रासातून ‘भुताने झपाटले’ अशी अफवा पसरली आणि इतर मुलींमध्ये भीती निर्माण झाली. मुलींनी सुटीच्या काळात भयपट पाहिले होते. वसतिगृहातही त्याचीच चर्चा रंगली. शारीरिक-मानसिक त्रासानंतर डॉक्टरांकडे न जाण्याच्या प्रवृत्तीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले.

समितीने पालकांशीही संवाद साधला. पालकांचा शाळेवरील विश्वास त्यामुळे पुन्हा दृढ झाला. मुलींनी स्वतः आश्रमशाळेतील सुविधा, जेवण आणि शिक्षकांच्या प्रेमाबद्दल समाधान व्यक्त केले. पालकांनीही आपल्या मुलींना लवकरात लवकर शाळेत परत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
सातत्यपूर्ण प्रबोधनाची गरज ‘अंधश्रद्धा केवळ अज्ञानातून नव्हे, तर भीती, अफवा आणि परंपरेतून जन्म घेते. त्यामुळे केवळ ‘भूत नसते’ एवढे सांगून भागणार नाही, तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे सातत्याने व संवेदनशीलतेने प्रबोधन करणे गरजेचे आहे,’ असे प्रा. प्रवीण देशमुख व रामभाऊ डोंगरे यांनी केले.

या बरोबरच आश्रमशाळांमधील जेवण व राहण्याच्या असुविधांमध्ये तातडीने सुधारणा होणे आवश्यक असल्याचे मत नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले. भीतीच्या छायेतून बाहेर पडलेल्या या मुलींमुळे डोमा आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने फुलण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. मुलींच्या घरी भेट दिल्यानंतर त्या पूर्णपणे स्वस्थ आणि सामान्य स्थितीत असल्याचे दिसून आले. भुताची भीती दूर झाल्याने घाबरलेल्या मुली आता मनमोकळेपणाने बोलू लागल्या असून, ‘आम्हाला पुन्हा शाळेत जायचे आहे’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी दिली.