दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक, तापमानातील सततचे चढउतार आणि काहीच दिवसांपुरती राहिलेली थंडी हे वातावरण पुण्यात डासांच्या वाढीसाठी पोषक ठरले असून वर्षांच्या सुरुवातीपासूनच शहराला चिकुनगुनियाने ग्रासले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भावही यंदा गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
२०१५ मध्ये वर्षभरात शहरात चिकुनगुनियाचे ६६ रुग्ण सापडले होते. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर एप्रिलमध्ये केवळ एका चिकुनगुनिया रुग्णाची नोंद झाली व पुढे पुन्हा मे ते जुलै या काळात चिकुनगुनियाची रुग्णसंख्या शून्य राहिली. यंदा मात्र बुधवापर्यंतच चिकुनगुनियाचे ७२ रुग्ण सापडले आहेत.
डेंग्यूचा प्रादुर्भाव देखील गतवर्षीच्या तुलनेत वाढला आहे. २०१५ मध्ये जानेवारीत ११, तर फेब्रुवारीत केवळ ८ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली होती. वर्षभरात शहरात तब्बल १,२५९ डेंग्यूसदृश रुग्ण सापडले असले तरी डेंग्यूची रुग्णसंख्या वाढण्यास जुलैपासून सुरुवात झाली होती. या वर्षी आतापर्यंतच डेंग्यूची लागण झालेले २९ रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत आढळलेल्या संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या ६६ आहे.
‘डेंग्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन पालिकेचे कर्मचारी धूर फवारणी करत आहेत. तर डेंग्यूसदृश रुग्णांच्या घरी जाऊन परिसरात डासांची पैदास झाली आहे का, याची पाहणी करत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया या दोन्हीच्या प्रतिबंधासाठी डास नियंत्रण हाच उपाय आहे,’ असे पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले.