लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पुण्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहतात. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश खड्ड्यात पडला. गणेशसोबत खेळत असलेल्या मुलांनी त्याच्या आईला याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा-तब्बल २० दिवसांनी कार चालकावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होताच पुणे पोलिसांना आली जाग

आईने धावत जाऊन गणेशला खड्ड्याबाहेर काढले. गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.