शालाबाह्य़ मूल दाखवा आणि ५०० रुपये मिळवा!

शालाबाह्य़ विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने आता नवी युक्ती शोधली आहे

शालाबाह्य़ विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने आता नवी युक्ती शोधली आहे. ‘शालाबाह्य़ मूल दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा,’ अशी योजना पुढील वर्षांपासून लागू करण्याचा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. याआधी केलेल्या शालाबाह्य़ मुलांच्या सर्वेक्षणात चूक झाल्याचे मान्य करून डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सर्वेक्षणात एकही शालाबाह्य़ मूल सुटणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाने जुलैमध्ये केलेले शालाबाह्य़ मुलांचे सर्वेक्षण फसले. त्यानंतर नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विभागाने हेल्पलाईनही सुरू केली. मात्र, त्यावरही नागरिकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. आता डिसेंबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण करून पुढील वर्षांपासून ‘शालाबाह्य़ मूल दाखवा, पाचशे रुपये मिळवा,’ अशी योजनाच सुरू करण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. मात्र, हा भत्ता कसा मिळणार, कुणाला मिळणार, मुलांबाबत माहिती कोठे द्यायची याचे तपशील अद्याप निश्चित झालेले नाहीत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून ही योजना अमलात आणण्याचे विचाराधीन असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.
आता स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शालाबाह्य़ विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये सर्वेक्षण होणार आहे. स्थलांतरित मुलांची या सर्वेक्षणामध्ये नोंद व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणांहून मुले स्थलांतरित होतात, अशी ठिकाणे शोधण्यात येत असून राज्यात अशी साधारण एक हजार ठिकाणे समोर आली आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतरित मुलांसाठी शिक्षण भत्ता, जेवण, नाश्ता शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे. मुले आपल्या नातेवाइकांकडेच राहावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र, ज्या मुलांसाठी राहण्याची सुविधा नाही, त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाचीही सोय करण्यात येणार आहे, असे डॉ. भापकर यांनी सांगितले.

‘‘शालाबाह्य़ मुले शोधण्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता देणे विचाराधीन आहे. पुढील शैक्षणिक वर्षांत त्याची अंमलबजावणी होऊ शकेल. शालाबाह्य़ व स्थलांतरित मुले नागरिकांनी शोधून दिल्यास त्यांना हा भत्ता मिळू शकेल. शालाबाह्य़ मुलांच्या मागील सर्वेक्षणानंतर आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी चर्चा केली. आधीच्या सर्वेक्षणांत काही त्रुटी होत्या, मात्र या सर्वेक्षणातून एकही शालाबाह्य़ मूल सुटणार नाही.’’
– डॉ. पुरुषोत्तम भापकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Child school win