१५ जानेवारीपासून सर्वेक्षण; ८०० स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

शैक्षणिक वर्ष संपता संपता राज्यातील किती विद्यार्थी अद्यापही शाळाबाह्य़ आहेत, याचे सर्वेक्षण शिक्षण विभाग करणार आहे. येत्या शुक्रवारपासून (१५ जानेवारी) राज्यातील शाळाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात येणार असून या सर्वेक्षणासाठी साडेआठशे स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

राज्यभर शाळाबाह्य़ विद्यार्थी शोधण्याची मोहीम एकदा फसल्यानंतर आता पुन्हा एकदा या सर्वेक्षण मोहिमेची जंगी तयारी शिक्षण विभागाने केली आहे. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यभरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जुलैमध्ये झालेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी महसूल विभागातील अधिकारी आणि शिक्षकांवर टाकण्यात आली होती. आता मात्र या सर्वेक्षण मोहिमेत विभागाने स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेतले आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जुलैमध्ये झालेल्या सर्वेक्षणात राज्यभरातून ५६ हजार शाळाबाह्य़ मुले असल्याचे आढळले होते. मात्र त्यामध्ये स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मुलांचा समावेश नव्हता. त्यामुळे या वेळी प्राधान्याने स्थलांतरित कुटुंबातील मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. वीटभट्टी, बांधकामे या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची मुले, ऊसतोड कामगारांची मुले यांची गणती करण्याच्या दृष्टीने जानेवारी महिन्यात हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ८२५ स्वयंसेवी संस्थांमधील प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे साडेतीन लाख विद्यार्थी हे सर्वेक्षण करणार आहेत. त्यापूर्वी गेल्या महिन्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात आणखी २ हजार ३२५ शाळाबाह्य़ मुले सापडली आहेत. त्यातील ५०३ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.