पिंपरी : शस्त्रक्रीयेनंतर तपासणीच्या बहाण्याने महिला रूग्णाशी अश्लील चाळे करणार्या चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
धैर्यशील शेटके (वय २७, रा. चिंचवड मूळ – कोल्हापूर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी शेटके याचे बीएएमएस शिक्षण झाले आहे. चिंचवड – संभाजीनगर येथील एका रूग्णालयात तो नोकरीला आहे. या रूग्णालयामध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी पिडीत महिला ८ जून रोजी दाखल झाली होती. तिच्यावर ११ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तपासणी करिता आरोपी डॉक्टर हा जनरल वॉर्ड मध्ये नेहमी जात होता. रविवारी डॉ. शेटके याने रुग्ण महिलेला तपासणीच्या बहाण्याने स्पर्श करताना अश्लील चाळे केले. महिलेनी ही बाब कुटुंबियांना सांगितल्यानंतर रूग्णालयात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर शेटके याला अटक करण्यात आली. डॉ. शेटके याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीत वाळलेल्या गवताला आग
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथील प्रूफ रेंज परिसरात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वाळलेल्या गवताला आगलागली. वार्यामुळे आग त्वरीत पसरली. ऑर्डनन्स फॅक्टरी अग्निशमन विभागाचे तीन बंब आणि पिंपरी-चिंचवडमहापालिका अग्निशमन विभागाचे चार बंब अशा एकूण सात बंबांच्या सहाय्याने आग त्वरीत नियंत्रणात आणण्यात यश आले.
देहूरोड येथे ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील प्रूफ रेंज परिसरात सोमवारी सकाळी वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. सध्या वार्याचा वेग असल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. वाळलेल्या गवतामुळे आग आजूबाजुला पसरण्यास सुरूवात झाली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अग्निशमन विभागाने तीन बंब तातडीने घटनास्थळी रवाना केले. याशिवाय महापालिका अग्निशमन विभागाचे चार बंबही घटनास्थळी दाखल झाले. एकूण सात बंबांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली.
ही आग प्रूफ रेंज परिसरातील वाळलेल्या गवताला लागली होती. आग अधिक पसरू नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती फॅक्टरी अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिली.
